कर्जत (प्रतिनिधी) : सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरी भागात दुकान व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची पद्धत रूढ आहे. चोरी, छेडछाड अश्या प्रकारच्या इतर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असल्याने नागरिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्राधान्य देतात,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्व समजल्याने आता गावोगावी सीसीटीव्ही कॅमेरे बसू लागले आहेत.
तालुक्यातील कोंभळी ग्रामपंचायतीने देखील पुढाकार घेत चोरी, दरोडा सारख्या घटना रोखण्यासाठी तसेच गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले त्यामुळे कोंभळीकरांची दिवाळी व लक्ष्मीपूजन सुरक्षित होणार आहे. तसेच चोरी, दरोडा, छेडछाड, गुन्हेगारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहणार आहे.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी अशी म्हण प्रचलित आहे, परंतु, जिच्या हाती गावच्या सत्तेची दोरी तीच विकास करी, अशी म्हण प्रचलित करण्याची वेळ आली आहे. कोंभळी गावातील मुख्य रस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले आहेत, यामध्ये कर्जत रस्ता, खांडवी रस्ता, घोगरगाव रस्ता, रवळगाव रस्ता, वेशीतून गावात जाणारा रस्ता, भैरवनाथ मंदिर परिसर व बाजारतळ हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर करण्यात आला आहे.
गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने पोलीस यंत्रणेलाही विविध गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत मिळणार आहे, तसेच गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गावात वचक राहणार आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वायजी इन्फोटेक यांनी केले.
कोंभळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, त्यामुळे चोरी, गुन्हेगारी सारख्या घटना रोखण्यात ही यंत्रणा प्रभावीपणे काम करेल असा विश्वास आहे, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने नागरिकांची दिवाळी सुरक्षित आणि शुभ होईल यात शंका नाही.
- अनुराधा साहेबराव काकडे
(सरपंच, कोंभळी ग्रामपंचायत)