कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील बेलगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते सचिन मीराबाई रखमाजी शिंदे यांची राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)कॉलेज, कर्जत च्या IMC (इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी) व्यवस्थापन समितीच्या शासकीय सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची व नेतृत्वगुणांची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाचे मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी IMC व्यवस्थापन समितीची यादी नुकतीच जाहीर केली त्यामध्ये सचिन शिंदे यांची व्यवस्थापन समितीच्या शासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.
सचिन शिंदे यांनी मागील दोन दशकांपासून सामाजिक कार्यात विशेष करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वंसेवक संघ, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटना, प्रधानमंत्री विकास योजना प्रचार व प्रसार समिती, अशा विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्यांवर विविध प्रकारच्या योजना तसेच वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
आताही विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आयटीआय कॉलेजच्या व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य पदाच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सचिन शिंदे म्हणाले,"माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत मला ही जबाबदारी व नवीन कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे याचा मला अभिमान वाटत आहे. युवकांना अत्याधुनिक औद्योगिक कौशल्य प्रशिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या कार्यकाळात आयटीआय कर्जतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध राहील."
सचिन शिंदे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच बेलगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.